महाड दुर्घटना : हरिहरेश्वरजवळ सापडला महिलेचा मृतदेह
आणखीन एक मृतदेह सापडला आहे... हरिहरेश्वर समुद्राजवळही एक मृतदेह सापडला.
रायगड : आणखीन एक मृतदेह सापडला आहे... हरिहरेश्वर समुद्राजवळही एक मृतदेह सापडला.
एका वयस्कर स्त्रीचा हा मृतदेह असून या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. सावित्री नदीवरील पुलापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर स्थानिकांना हा मृतदेह सापडलाय. मॉर्निंग वॉकला हे रहिवासी गेले असताना समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांना हा मृतदेह दिसला.
क्रेन आणि चुंबकाच्या साहाय्यानं शोध सुरू
एनडीआरएफच्या टीमसह नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांनीही बुधवारी युद्धपातळीवर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला. मात्र प्रवाशांना शोधण्यात अपयश आलं. बुधवारी काळोख पडल्यामुळं शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. दुर्घटनेला आता ३२ तास उलटून गेलेत. वाहत्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्यानं शोधकार्यात सतत अडथळे येत आहेत. सध्या क्रेन आणि चुंबकाच्या साहाय्यानं शोध सुरू आहे.
दरम्यान, सापडलेले दोन मृतदेह महाडच्या दुर्घटनेतील नसल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी दिलेली माहिती चुकीची असल्याचं पुढं आलंय. सापडलेले दोन्ही मृतदेह दुसऱ्या घटनेतील असल्याचं समजतंय.
नदीला आलेला पूर आणि सततच्या पावसामुळं बचावकार्यात अडथळे येत होते. दोन्ही बसेसमध्ये तब्बल २२ प्रवासी असल्याची माहिती आहे. तसंच काही तवेरासारखी छोटी वाहनंही या पुलावरून जात असताना नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळं बेपत्ता प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नौदलाची दोन आणि तटरक्षक दलाची दोन अशा चार हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे बचावकार्य सुरू होतं. जवळपास १६० जवान १२ बोटींच्या मदतीनं हे कार्य सुरू आहे. नौदलाचे पाणबुडेही या बचावकार्यात सहभागी झालेत. वाहून गेलेल्या एसटी बसेसचा आंबेतच्या खाडीपर्यंत शोध घेतला गेला. एनडीआरएफच्या डेप्युटी कमांडरनी शोधकार्याची माहिती दिली.