मुंबई : सामान्य माणसाला सरकारच्या दैनंदिन व्यवहारात सामील करुन घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात मागवलेल्या सूचनांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार सरकारकडे तब्बल तीन हजार सूचना आल्या आहेत ज्यांचा समावेश राज्याच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात केला जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डीएनए'ने  यासंबंधी वृत्त दिले आहे. राज्याच्या अर्थमंत्रालयाने सामान्य नागरिकांना त्यांच्या अर्थसंकल्पविषयक सूचना पोस्टाद्वारे अथवा ई-मेलद्वारे सरकारला कळवण्याची विनंती केली होती. गेल्यावर्षी आलेल्या सूचनांचा आकडा १,४०० इतका होता. तर यंदा याच आकड्याने ३००० चा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच यात दुपटीने वाढ झाली आहे. 


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मते ते स्वतः या सर्व सूचनांचा आढावा घेत आहेत. यातील अनेक सूचना फार छान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'राज्यासाठी सकारात्क अर्थसंकल्प तयार करणे ही केवळ एकतर्फी प्रक्रिया असू नये, यात नागरिकांचाही समावेश असावा याच उद्देशाने आम्ही ही पद्धत सुरू केली. त्याला मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे,' असे ते म्हणाले. 


विशेष म्हणजे सर्वात चांगल्या सूचना देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकाला ७.५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर २५ चांगल्या सूचनांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 


सरकार आपला महसूल कसा वाढवेल आणि सरकारी कारभारावरील खर्च कसा कमी करू शकेल या दोन प्रमुख कारणांसाठी या सूचना मागवण्यात आल्या होत्या. येत्या १८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.