नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यातल्या टाकळी गावात मृतावस्थेतल्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम लोकसहभागातून सुरु झालं आहे. यामुळे किमान ८ गावांचा पाण्याच्या प्रश्न सुटणार आहे. यासाठी 'नाम'च्या माध्यमातून अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला. तर साहित्यिक महेश एलकुंचवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी १ लाख रुपयांची मदत केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरहून सुमारे ५५ किलोमीटर दूर टाकळी हे साधारण ५०० लोकवस्तीचं गाव. या गावासोबातच नजिकच्या किमान ७ गावांच्या पाण्याची समस्या सोडवण्याची क्षमता या गावातल्या तळ्यात आहे. पण आजवर या तलावात गाळ साचून हा तलाव पूर्णपणे बुजून गेलाय. नाम फाऊंडेशननं या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम हाती घेतलंय. 


या कामांतर्गत तलावाचं खोलीकरण होणार असून त्यासाठी किमान एक महिना कालावधी लागणार आहे. तलावाच्या खोलीकरणासोबतच गावातल्या प्रत्येक घरात शौचालय बांधण्याकरता गावकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचं आश्वासन यावेळी गावाच्या महिला सरपंचांनी दिले 


दरम्यान, एका कंत्राटदाराच्या माध्यमाने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. संबंधित कंत्राटदाराला याकरिता आवश्यक ती उपकरणं विनामुल्य देणार असून गावकऱ्यांच्या सहभागातूनच हा प्रकल्प राबवला जाणार आहे, असे अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.