स्वाती नाईक, पनवेल : पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन पनवेल सुकापूर येथील भगतवाडीत मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये आदिवासी मुलासाठी वसतीगृह आहे. या वसतीगृहात 31 आदिवासी मुलं वास्तव्याला आहेत. शाळेत 55 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 


इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या नऊ वर्षीय हर्षदा लेंडी या आदिवासी विद्यार्थिनीवर 100 रुपये चोरीचा आरोप करत मुख्याध्यापिका सुविधा बेडदे यांनी तिला भयानक शिक्षा दिली.


गॅसवर स्टीलचा कालथा तापवून विद्यार्थिनीच्या पाठीवर चटके दिले गेले. 18 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. ही घटना कोणालाही सांगायची नाही, असा दमच मुख्यध्यापिकेने दिला होता. परंतु 31 तारखेला जेव्हा पालक शाळेत आले. त्यावेळी विद्यार्थिनीने या घटनेची माहिती पालकांना दिली. यावेळी शाळेतील इतरही मुलांना अशा प्रकारे अमानुष मारहाण केली जाते असा आरोप मुलीचे वडील गंगाराम लेंडी यांनी केलाय. 


यावेळी इतर विद्यार्थ्यांनी देखील आपल्या सोबत झालेल्या त्रासाची माहिती दिली. पालकांनी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठत मुख्याध्यापिकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्याध्यापिकेला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया यांनी दिलीय. 


दरम्यान, शाळेच्या संस्था अध्यक्ष धनंजय बेड़दे यांनी अजब तर्क लावत मुख्याध्यापिकेचा बचाव केलाय. विद्यार्थिनीला झालेली जखम ही इन्फेक्शनमुळे झालीय. शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत या प्रकरणात सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 


या शाळेतील प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांमागे आदिवासी विभाग वर्षाला 50 हजार रुपये देते. मात्र, शिक्षकच विद्यार्थ्यांना अशी अमानुष वागणूक देत असतील तर या मुलांची शिक्षणाची वाट आणखी बिकट होईल...