प्रताप नाईक, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर इथल्या मतिमंद विद्यालयातील एका मुलाचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर इथं प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक सामाजिक संस्थेचं गतीमंद विद्यालय आहे. पंचरत्न राजपाल यांनी २००९ साली या संस्थेची स्थापना केली. याच शाळेतील विद्यार्थ्यांना पोषक आहार न मिळाल्याने तीन विध्यार्थी कुपोषित असल्याचं उघडकीस आलं. या तिघांना उपचारासाठी सी.पी.आर इथं दाखल केलं. मात्र, त्यापैंकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


इतर दोघांची प्रकृतीही चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संस्थेच्या या कारभाराची शासकीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आलीय.


शाळेला मान्यताच नाही...


या विद्यालयात विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जाही योग्य नसल्याच्या नोंदी तपासणीनंतर उघड झाल्या होत्या. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. मात्र, तरीही संस्था चालकानं शाळा सुरूच ठेवली. वेळीच जर यावर कडक कारवाई केली असती तर एक निष्पाप बळी गेलाच नसता.