ममतासह पती विकीचा कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणात हात
ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणी आता अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव समोर आलंय. आतापर्यंत तिच्याबाबत केवळ संशय होता. मात्र या प्रकरणातल्या दोन आरोपींनी थेट न्यायालयात ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी यांची नावं घेतली आहेत.
मुंबई : ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणी आता अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव समोर आलंय. आतापर्यंत तिच्याबाबत केवळ संशय होता. मात्र या प्रकरणातल्या दोन आरोपींनी थेट न्यायालयात ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी यांची नावं घेतली आहेत.
ममताच्या विरोधात पुरावे
एकेकीळी बॉलिवूडची आघाडीची हिरॉईन असलेल्या ममता कुलकर्णीची अवस्था सध्या अशीच झाली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तिचं नाव आले आहे. ठाण्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणात ममताचा समावेश असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागलेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी नाव आलेल्या सोलापुरातल्या चिंचोलीमधल्या अॅवोन लाईफ सायन्सेस या कंपनीचे तब्बल ११ लाख शेअर्स ममताच्या नावानं फिरवण्याची योजना होती. सध्या ममता आणि विकी केनियामध्ये असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इंटरपोलच्या मदतीनं या दोघांभोवती पाश आवळण्याची तयारी ठाणे पोलिसांनी केली आहे.
ममताचे वर्सोवा कनेक्शन
ममताच्या वर्सोव्यामधल्या एका इमारतीत असलेल्या ४ फ्लॅट्सचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. अब्दुला हे आणखी एक महत्त्वाचं नाव तपासादरम्यान समोर आलंय. हा आफ्रिकेत राहून अमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट चालवतो. ८ जानेवारीला केनियामध्ये एक मिटिंग झाली. याला अवोन लाईफ सायन्सेसचा मनोज जैन, जय मुखी, किशोर राठोड, विकी गोस्वामी, ममता, डॉ अब्दुला आणि त्याचे दोन साथीदार उपस्थित असल्याची माहिती मिळाली.
ड्रग्ज विकून नफ्याची टक्केवारी
या मिटिंगमध्ये अॅफेड्रीनचा साठा वितरीत कसा करायचा आणि ममताच्या नावावर किती शेअर करायचे याची चर्चा झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. ड्रग्ज विकून येणाऱ्या नफ्याची टक्केवारीही ठरली होती. या प्रकरणी आतापर्यंत सागर पोवळे, मयूर सुखदरे, राजेंद्र डीमरी, धानेश्वर स्वामी,पुनीत शृंगी, मनोज जैन, हरदीपसिंग गिल, नरेंद्र काचा, बाबासाहेब शंकर धोत्रे आणि जय मुखी यांना अटक करण्यात आलीये.
हे आहेत फरार
तर विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी, डॉ.अब्दुल्ला, त्याचे दोघे साथीदार, गुजरातच्या माजी आमदाराचा मुलगाकिशोर राठोड आणि सुशीलकुमार हे ७ जण फरार आहेत. या प्रकरणात बॉलीवूडमधले आणखीही काही मोहरे पोलिसांच्या रडारवर आहेत. आगामी काळात याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.