सातारा सियाचिनमध्ये हौतात्म्य आलेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाऊ तानाजी यांनी सुनील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरसुपुत्राला निरोप देताना संपूर्ण म्हस्करवाडीवर शोककळा पसरली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील यांच्या पश्च्यात पत्नी आणि ११ महिन्यांची तनया नावाची मुलगी आहे. तिचा १९ फेब्रुवारीला पहिला वाढदिवस आहे. सियाचीनमध्ये तैनात असल्यामुळं मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला आपण हजर राहू शकणार नाही, याची खंत त्यांनी पत्नीला फोन करून व्यक्त केली होती. मुलीचा वाढदिवस आणि नव्या घराची वास्तुशांत दोन्ही एकाच दिवशी करा, असा निरोपही पत्नीकडे त्यांनी दिला होता. 


मात्र तनयाच्या वाढदिवसाअगोदरच सूर्यवंशी यांना हौतात्म्य आल्याची बातमी गावात येऊन धडकली आणि अख्ख्या गावावर शोककळा पसरली. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची १० दिवस प्रतिक्षा करावी लागली. सियाचीनमधलं हवामान विमान उड्डाणासाठी योग्य नसल्यामुळं मृतदेह हलवणं शक्य होत नव्हतं.