शहीद गावडेंवर आंबोलीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवान पांडुरंग महादेव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
आंबोली : जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवान पांडुरंग महादेव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सिंदुधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
शहीद पांडुरंग गावडे यांचे पार्थिव आज सकाळी गोव्यातून आंबोली येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेस सुरूवात झाली त्यानंतर पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. राज्याच्या या शूरपुत्राच्या सन्मानासाठी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. या वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, बिगेडियर प्रविण शिंदे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी उपस्थित होते.
उपचारादरम्यान निधन
श्रीनगर-कुपवाडातील चकड्रगमुल्ला या गावी शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आंबोली-मुळवंदवाडी येथील पांडुरंग महादेव गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.
तब्बल नऊ तासांपर्यंत दहशतवाद्यांबरोबर चकमक चालली. या चकमकीत भारतीय जवानांनी सर्व पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला. याचवेळी केलेल्या गोळीबारात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे गावडे आणि ४७ रायफल्सचे जवान अतुल कुमार हे जखमी झाले. उपचारावेळी गावडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हुशार होते पांडुरंग
पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात दाखल झाले. देशभर सेवा बजावताना त्यांनी विविध क्षेत्रात चमक दाखविली. ते चांगले फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉलपटू होते. तसेच त्यांना रेडिओ ऑपरेटर युनिटचे पारितोषिकही पटकावले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते.