साताऱ्याचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण, पार्थिवाची प्रतिक्षा
सियाचीन येथे हिमसख्खलन होवून झालेल्या दुर्घटनेत साताऱ्याचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलंय.
सातारा : सियाचीन येथे हिमसख्खलन होवून झालेल्या दुर्घटनेत साताऱ्याचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलंय. त्यांना आलेल्या हौताम्यामुळं माण तालुक्यातल्या म्हसकरवाडी या त्यांच्या गावावर शोककळा पसरलीय. त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्यांच्या पार्थिवाची प्रतिक्षा करत आहेत.
मात्र सियाचीनमधल्या खराब हवामानामुळं वीरमरण आलेल्या सर्व जवानांचं पार्थिव आणण्यात अडथळे येत आहेत. हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतरही या जवानांचा संघर्ष संपलेला नसल्याचंचं दिसतंय. सियाचीनमधल्या हिमस्खलनात नऊ जवान शहीद झाले होते तर एका जवानाला उपचारादरम्यान हौताम्य आलं होतं.
सियाचीन मध्ये वीरमरण आलेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासकीय यंत्रणेमार्फत अंत्यविधीची तयारी सुरू आहे. मात्र, सूर्यवंशी याचं पार्थिव यायला वेळ लागत असल्याने, अंत्यविधीची तयारी देखील खोळंबली आहे.
शहीद जवान सुनील सुर्यवंशी यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. सुनील सूर्यवंशी याचं पार्थिव गावात येणार असल्याने गावकर्यांनीच रस्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं. अखेर गावकऱ्यांच्या पुढाकारानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली.