लातूर : लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.  जिल्ह्यात ७  मार्चला एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आहे. सभेच्या २ दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला अलविदा म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक पक्षाने लातूरच्या जिल्ह्याध्यक्षाची उचलबांगडी करत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या मोहमदअली शेख यांच्या समर्थकांनी एमआयएम सोडण्याचा निर्णय घेतला. लातूर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्हाध्यक्षाची उचलबांगडी केल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे.


एमआयएमला राम राम करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओवेसी बंधूंचे पुतळे पायदळी तुडवत जाळले. त्यामुळे ७ मार्चच्या सभेत काय होणार, यावर सर्वांची नजर आहे.


आमदार इम्तियाज जलील यांच्यावर सर्वाचा रोष आहे. जलील यांच्या नावे घोषणाबाजी करत त्यांचे पुतळे पायदळी तुडविण्यात आले. त्यानंतर हे पुतळे देखील जाळण्यात आले.


मोहमदअली शेख हे एमआयएमच्या राज्य कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी निलंगा, देवणी, औसा, नळेगाव यांसह जिल्ह्यातील दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत, ओवेसी बंधूंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही पक्षात न जाता वेगळा पर्याय काढू असं सदस्यांनी म्हटलं आहे.