नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नागपूरच्या आमदार निवासात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना उपराजधानी पुन्हा एकदा अशाच एका घटनेनं हादरलीय. एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केलाय.
नागपूर : नागपूरच्या आमदार निवासात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना उपराजधानी पुन्हा एकदा अशाच एका घटनेनं हादरलीय. एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केलाय.
नागपूरच्या काटोल रोड इथल्या महिला सुधारगृहातून चार अल्पवयीन मुली गेल्या आठवड्यात पळाल्या होत्या. त्या चार मुलींपैकी एक मुलगी नागपूरच्या महात्मा गांधी चौकात एका ऑटो चालकाच्या संपर्कात आली.
मदत करण्याचं आमिष दाखवून या रिक्षाचालकानं तिला सुगत नगरमध्ये नेलं. यावेळी आपल्या मित्रांच्या मदतीने त्यानं या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर नराधम तिला रस्त्यावर सोडून पसार झाले.
एका पोलीस शिपायाची नजर तिच्यावर पडली आणि आस्थेने चौकशी केली. त्याने महिला सुधारगृहातल्या अधिका-यांना पाचारण केलं. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तपास केला आणि चारही नराधमांच्या मुसक्या आवळल्या. पीडित मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आलीय.