मनसेच्या एकमेव आमदाराचा राजीनामा पण...
मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊ केला पण...
जुन्नर : मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊ केला आहे. बैलगाडा शर्यत सुरू करावी या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला. परंतू तो मुख्यमंत्र्यांनी नाही स्विकारला.
आमदाराला राजीनामा द्यायचा असेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. तो स्विकारण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. त्यामुळे आमदारांचा हा राजीनामा पब्लिसीटी स्टंट होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री शिवनेरी गडावर सरकारी शिवजयंती साजरी करण्यासाठी पोहोचले होते त्यावेळेस मनसेचे आमदार शरद सोनवणे हे देखील तेथे उपस्थित होते. पण मंत्र्यांना राजीनामा द्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवावा लागतो आणि आमदारांना राजीनामा द्यायचा असेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा लागतो. पण मनसेच्या आमदारांनी तो मुख्यमंत्र्यांकडेच सोपवला. त्यामुळे हा पब्सिलीसिटी स्टंट होता का असा प्रश्न पडू लागला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करत म्हटलं होतं की राजीनामा द्यायचा असेल तर तो द्या की खिशात घेऊन का फिरत आहात. शिवसेनेला सत्ता सोडवत नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पण मनसे आमदाराला देखील बैलगाडी शर्यतीच्या मागणीसाठी खरच राजीनामा द्यायचा होता तर त्यांनी मग तो विधानसभा अध्यक्षांकडे का दिला नाही अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत.