यवतमाळ : शाळकरी विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावरुन यवतमाळमध्ये सलग तिस-या दिवशी जनक्षोभ पाहायला मिळाला.. संस्थाचालकांविरोधातला रोष रस्त्यावर दिसून आला.. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्था सचिव किशोर दर्डा फरार झालेत.. पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पथकं रवाना केलीत.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या 17 विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणावरुन यवतमाळ धुमसतंय.. याप्रकरणी नराधम शिक्षक यश बोरुंदीया आणि अमोल क्षीरसागर यांना अटक झाली.. 


मात्र जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते विजय दर्डा तसंच संस्था सचिव किशोर दर्डा यांनी यांनी प्रकरण दडपल्याचा आरोप या संतप्त आंदोलकांचा आहे.. 


किशोर दर्डांना अटक करा अशी मागणी पालक आणि आंदोलकांची आहे.. दोन दिवसांपासून विजय दर्डा आणि किशोर दर्डांच्या बंगल्यापुढे आंदोलकांचा रोष पाहायला मिळतोय.. 


तिस-या दिवशीही पालकांनी दर्डांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं.. आक्रमक जमावानं दर्डांच्या नाम फलकाची, प्रवासी निवा-याची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली.. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरु केला आणि आंदोलन चिघळलं... पोलिसांवर जमावानं दगडफेक सुरु केली.. 


जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या. या सगळ्या गोंधळात पालक आणि पोलीसही जखमी झालेत.. पोलिसांनी पत्रकारांवरही हल्ला केल्यानं 3 पत्रकारही जखमी झालेत. अखेर पोलीस अधीक्षकांनी जमावापुढं येऊन संस्थाचालकांच्या अटकेची ग्वाही दिली.


सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे.. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी योग्य त्या कारवाईची अपेक्षा व्यक्त होतेय.. मात्र यवतमाळवासियांचा हा संताप पाहून दिल्लीतल्या निर्भया प्रकरणी झालेल्या आंदोलनाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात..