अश्विनी पवार, पुणे : पुण्याच्या नांदेड गावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरुच आहे. या माकडाची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. आतापर्यंत या माकडानी 25 हून अधिक जणांना चावा घेतलाय. माकडाच्या दहशतीमुळे गावातल्या नागरिकांना दिवसाही घरं बंद ठेवावी लागतायत. तर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागसुद्धा हतबल ठरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडतोय मात्र त्याचवेळी पुण्याजवळील नांदेड गावात मात्र शुकशुकाट आहे. कारण, सध्या हे गाव माकडांच्या दहशतीखाली आहे.


पुण्याहून खडकवासला धरणाकडे जाताना रस्त्यात लागणारं हे नांदेड गाव... मात्र, सध्या या गावात कमालीची दहशत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून माकडांनी या गावात उच्छाद मांडलाय. त्यातच एका पिसाळलेल्या माकडाने अनेकांना जखमी केलंय. घरात घुसूनही या माकडांनी हल्ला केल्याने नागरिक हवालदिल झालेत. त्यामुळे दिवसाही गावकरी आपल्या घराचे दरवाजे बंद ठेवत आहेत. तर दुकानही बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय.  


माकडांपासून संरक्षणासाठी तरूण रात्रीचा पहारा करताहेत. मात्र तरीही माकडांचा उच्छाद कमी झालेला नाही. तर माकडांना पकडण्यासाठी आवश्यक सामुग्री नसल्याने वनविभागही हतबळ झालंय. या माकडाचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न सध्या गावकऱ्यांना पडलाय.