मुंबईत सुरु होणार कसिनो ?
परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कसिनो सुरु करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबई: परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कसिनो सुरु करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्य सरकारला दिले आहेत. इकोनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
राज्य सरकारही या प्रस्तावाबाबत विचार करत असून कसिनोला कायदेशीर मान्यता द्यायचा विचार सरकार करत असल्याचं बोललं जात आहे. सुरवातीला हे कसिनो राज्य सरकारनंच चालवावेत, तसंच फक्त परदेशी पर्यटकांनाच कसिनोमध्ये एन्ट्री देण्यात यावी, असंही या प्रस्तावात नमुद करण्यात आलं आहे. कसिनोला परवानगी दिली तर महसुलामध्ये मोठी वाढ होईल, असं कारणही देण्यात आलं आहे.
या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे. सत्तेत असलेली शिवसेना या प्रस्तावाबाबत काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या गोवा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये कसिनोला परवानगी आहे.