अलिबाग : मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला  बसलाय. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येत आहे. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक रोहा मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, दरड हटविण्यासाठी खूप वेळ जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमध्येही संततधार सुरूच आहे. महाडमध्ये नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रभर पडलेल्या पावसानं सावित्री, गांधारीच्या पातळीत वाढ झाली आहे.


किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या दस्तुरी नाक्यावरही दोन दोन फूट पाणी साचलेय. त्यामुळे वाहतुक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. महाड परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


वसई दमदार हजेरी


मुंबईतल्या वसईमध्ये पावसाची दमदार हजेरी लावलीय. १२ तासांत वसईमध्ये तब्बल २०७ मीलिमीटर पावसाची नोंद झालीय. पावसामुळे वसईतला सन सिटी गास रोड पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भूईगाव-निर्मळ-कळंब इथे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर कारवा लगतो आहे. 


नालासोपारातही संततधार सुरुच आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलंय. नालासोपारा आणि आजूबाजूच्या परिसरात व स्टेशन जवळ पाणीच पाणी झालंय. त्यामुळे रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिरानं धावतायत. आचोळे रोड, तुळींज पोलीस ठाणे महेश पार्क, स्टेशन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.


लोणावळा शहरात रात्रीपासून मुसळधार


लोणावळा शहरातही रात्रीपासून पाऊस मुसळधार बरसतोय. शहरांतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय. काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडलीत. गेल्या २४ तासांत लोणावळ्यात एकूण १६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.