निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सधन उमेदवारांना सोन्याचा भाव!
सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय.
सांगली : सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय.
सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून जेष्ठ नेते मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीकडून शेखर गोरे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. तर भाजपनं नगरसेवक युवराज बावडेकर यांना उमेदवारी दिलीय. या ठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून, काँग्रेस नगरसेवक शेखर माने यांनी बंडखोरी करत आपला अर्ज भरला आहे.
अर्ज मागे घेण्याच्या तारखे आधीच धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजाराचे आरोप प्रत्त्यारोप होऊ लागले आहेत. खार्चिक निवडणूक लक्षात घेत, जवळपास सर्वच पक्षांनी सधन उमेदवारच उभे केले आहेत.
विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या या विधान परिषद निवडणुकीत पालिका नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य मतदान करतात. भविष्यात हीच मंडळी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यामुळे या घोडेबाजार, तसंच धनशक्तीला हे मतदार कसा प्रतिसाद देतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान किंग किंवा किंगमेकर आपणच असणार असा दावा, भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय. तर काँग्रेस नेत्यांच्या अति आत्मविशासामुळेच आघाडी तुटली... आम्ही नेहमीच काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्नशील असतो... मात्र काँग्रेस अनुकूल नसते, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलीय.
तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर यापूर्वी 10 गुन्हे दाखल आहेत, याची आठवण या निमित्तानं काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी करुन दिलीय.
ग्रामपंचायत निवडणूक ते लोकसभा निवडणूक सगळ्याच निवडणुकांत पैशांचा वापर होतो, हे उघड गुपित आहे. त्याला ही विधान परिषद निवडणूकही अपवाद नाही.
एकंदरीत दोन्ही काँग्रेसनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्यामुळे, या मतदारसंघातलं वातावरण कमालीचं तापलं आहे.