परभणी : आयसीस या दहशतवादी संघटनेचं मराठवाडा कनेक्शन समोर आलंय. मराठवाड्यातले अनेक मुस्लिम तरूण आयसीसच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय. आधी नासेरबिन चाऊस. मग रिझवान आणि आता शाहिद खान. आयसीसशी संबंधित कुख्यात दहशतवाद्यांना एटीएसनं अटक केलीय. जगभरात दहशतवादी कारवाया घडवणा-या या संघटनेची पाळंमुळं आता महाराष्ट्रात रुजत असल्याचं चित्र दिसत आहे. वर्षभरापूर्वी कल्याणमधील चार भरकटलेले तरूण थेट आयसीसच्या कळपात सामील झाले. त्यानंतर कल्याण, परभणी, नांदेड अशा ठिकाणाहून आयसीस कनेक्शन उघड होतंय... त्यातच मराठवाड्यातील 100 पेक्षा अधिक तरूण दहशतवादी ट्रेनिंगसाठी गेल्याचा दावा शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी थेट विधानसभेत केल्यानं खळबळ उडाली आहे.


समाजवादी पार्टी आणि एमआयएमनं हा दावा खोडून काढलाय. एटीएस आणि पोलिसांकडून मुस्लिम तरूणांचा छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
उल्लेखनीय बाब म्हणजे दहशतवादी ट्रेनिंगसाठी विदेशात निघालेल्या 100 तरूणांची समजूत काढण्याचा दावा एटीएस प्रमुखांनीच लातूरच्या भाषणात केला. पण ती आकडेवारी देशभरातली आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात खरंच आयसीसची पाळंमुळं खोलवर रूजलीयत का? एटीएस आणि पोलिसांकडून खरंच मुस्लिम तरूणांचा छळ होतोय का? की केवळ राजकारणासाठी या मुद्याचा वापर होतोय? असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत.