पुणे : देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, जलसंधारण, ठिबक सिंचन, घर बांधणी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा अनेक योजनांच्या सहाय्याने मदतीचा भरघोस हात पुढे केल्यानंतर 'नाम फाउंडेशन' आता देशाच्या संरक्षणार्थ रात्रंदिवस झटणाऱ्या जवानांसाठी पुढे सरसावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या १० एप्रिलला गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात 'जय जवान, जय किसान' या घोषणेअंतर्गत 'नाम फाउंडेशन'च्यावतीनं महाराष्ट्रातील २० शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख ५० हजाराची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही मदत स्वतः नाना पाटेकर यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.


हा उपक्रम फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून या नंतर विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन देशभरातील जवानांच्या कुटुंबियांना या मोहिमेद्वारे मदत करण्याचा नाम फाउंडेशनचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिलीय. तसेच या कार्यक्रमाद्वारे देशाच्या युवावर्गाला शेतकरी आणि जवानांच्या सद्यस्थितीचे गांभीर्य कळेल, अशी आशा व्यक्त करून जास्तीत जास्त युवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असं आवाहन अनासपुरे यांनी केलंय.  


हा कार्यक्रम १० एप्रिल २०१७ रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे सायंकाळी ५.३० वाजता सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.