गुंडांना तडीपारीच्या, तर माजी महापौरासह २० नगरसेवकांना नोटीसा
महापालिका निवडणुकांआधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुंडांच्या तडीपारीला नाशिक पोलिसांनी सुरुवात केलीय. तर माजी महापौरसह १५ ते २० विद्यमान नगरसेवकांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आलीय. .
मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : महापालिका निवडणुकांआधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुंडांच्या तडीपारीला नाशिक पोलिसांनी सुरुवात केलीय. तर माजी महापौरसह १५ ते २० विद्यमान नगरसेवकांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आलीय. .
महापालिका निवडणुकाच्या रणधुमाळीला सुरवात झालीय. उमेदवारी कोणाला द्यावी यावर राजकीय पक्षांचे एकमत होत नसल्याने याद्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे नाशिक पोलिसांनी मात्र वेगळीच यादी तयार केलीय. या यादीत 38 ते 40 जणांची नावं आहेत. ही यादी आहे शहरात धुमाकूळ घालू शकतील अशा गुन्हेगारांची... अट्टल गुंडांना मनपा निवडणुकीआधी तडीपार केलं जाणार आहे.
महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचा मागील आठवड्यातच खून झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजलीय. त्यातच पोलिसांनी आता राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनाही रडारवर घेतल्यानं कार्यकर्त्यांचं धाबं दणाणलंय. नाशिक शहराच्या माजी महापौरासह महापालिकेतील माजी पदाधिकारी आणि जवळपास २० हून अधिक विद्यमान नगरसेवकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमी लिहून घेतली जातेय.
राजकारण आणि गुन्हेगारी जगत एकमेकांपासून दूर होऊ शकत नाहीत हे आजवरचा इतिहास सांगतो. गेल्या सहा महिन्यात कारागृहातून पाचशेहून अधिक गुन्हेगारांना राजकीय नेत्यांनी बाहेर काढल्याची मध्यंतरी शहरात चर्चा सुरु होती. त्यामुळे पोलिसांनी कडक धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि राजकीय क्षेत्र या दोघांवरही काही अंशी अंकूश बसणार आहे.