रत्नागिरी : चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरूडा कंपनीत मुकेश आणि अनिल हे कर्मचारी कंपनीतील टाकाऊ कचरा मोठ्या बॅरलमध्ये भरत असताना ही वायुगळती झाली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कर्मचा-यांनी त्यांना तातडीने चिपळूणच्या लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र मुकेश पवारचा मृत्यू झाला. मृत मुकेश दीड वर्षांपासून या कंपनीत कामाला आहे. 


गेल्या दोन महिन्यात लोटे एमआयडीसीत अपघातांचं चक्र सुरू आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाल्यापासून एमआयडीसीचे चेंबर्स ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी बाहेर पडल्याच्या घटना पुढे  आल्या होत्या.  एस. आर. ग्रपुच्या इंडियन ऑक्झीलेट कंपनीत झालेली वायुगळती, त्यानंतर ए.बी.माऊरी कंपनीतून ओढ्यात सोडले गेलेले सांडपाणी आणि अन्य कंपन्यांमध्ये झालेले स्फोट त्यामुळे लोटो एमआयडीसी अधिक चर्चेत आलीय. विशेष म्हणजे औद्योगीक सुरक्षा मंडळ या ठिकाणी नावापुरते असल्याचंही निष्पन्न झाले आहे.