लातूर : पुरोगामी महाराष्ट्रातील हुंडाबळीच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. लातूर जिल्ह्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला आहे. निलंगा तालुक्यातील हालसी हत्तरग्यातल्या वर्षाराणी फुलसुरे या तरुणीचा विवाह गेल्या वर्षी हालसी तिप्पनबोने याच्याशी झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहानंतर सुरुवातीचे दोन महिने संसार आनंदानं सुरू होता. मात्र त्यानंतर माहेरहून आणखी पैसे आणण्याचा तगादा नवविवाहिता वर्षाराणीकडे सुरू झाला. सतत पैश्यांची मागणी सुरु झाली. त्यात विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. 


गेली दहा महिने पतीने आणि सासरच्या मंडळींनी मिळून वर्षाराणीचा अतोनात छळ केला. त्यानंतर या सर्वांनी मिळून ऐन लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास वर्षाराणी हीच गळा दाबुन हत्या करण्यात आली असा आरोप मुलीचे वडील लक्ष्मण फुलसरे यांनी केलाय. 


मयत वर्षाराणीच्या अंगावर मारहाण केल्याच्या जखमा स्पष्टपणे दिसत आहे. गळा दाबल्यानंतर वर्षाराणीला फासावर लटकावून आत्महत्येचा बनाव सासरच्या मंडळींनी रचल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर पती शिवशंकर तिप्पनबोने आणि त्याचे आई-वडील फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.