नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना, बॅंकेत गर्दी तर एटीएम बंदने सामान्यांचे हाल
नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली.
नाशिक : नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली.
नाशिक शहरातील शरणपूर रोडसारख्या मध्यवस्तीत आणि महत्त्वाच्या भागातील विविध बँकांची एटीएम बंद आहेत. शहरातल्या बँकींगची काय अवस्था आहे हे यावरून दिसून येईल. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील बँका बंद होत्या. एटीएममध्ये भरणा केलेला पैसा दुपारनंतरच संपला. त्याचा परिणाम लगेच जाणवायला लागला. शहरात 900 च्या आसपास एटीएम यंत्र आहेत. बहुतांश एटीएम तीन दिवस बंद होती. काही मोजकीच सुरू होती तिथे लांबच लांब रांगा होत्या.
शहरातील बँकांच्या एटीएमध्ये पैशांच्या भरणा दोन सत्रात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्री परिस्थिती सुधारली नाही. एकीकडे ग्राहकांना दोन दोन तास रांगेत उभं राहून दोन हजार रूपयांची केवळ एक नोट मिळतेय. तर दुसरीकडे हजारोंच्या संख्येने दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी उघड होत असल्याने नोटबंदीचा फायदा नेमका कोणाला असा सवाल उपस्थित होतोय.