बुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा
७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
जळगाव : '७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन', असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे. मात्र असा कोणताही नियम नसल्याचं अमळनेरचे तहसिलदार प्रदीप पाटील यांनी म्हटलं आहे. तांत्रिक अडचण असल्यास एक दिवस उशीर होऊ शकतो, मात्र बुकिंगचा असा कोणता नियम कायदा नसल्याचं तहसिलदारांनी म्हटलं आहे.
मात्र बुकिंगने ७/१२ उतारा देणे हा माझा कायदा आहे, तुम्ही तहसिलदारांशी बोला, असंही या तलाठ्याने म्हटलं आहे. शेतकऱ्यांना पिककर्जासाठी ७/१२ उतारे लागतात, हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ७/१२ उतारे बुकिंगने असे सांगून टाळाटाळ होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे, संबंधित तलाठ्याला निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी एक दिवस अन्नत्याग करण्यात आला, पण अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांच्या जोखाडातून शेतकऱ्यांची सुटका होवू शकलेली नाही.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद गावातील तलाठ्याने स्वत:चाच कायदा ठरवला आहे. याचा त्रास येथील शेतकऱ्यांना होत आहे.
ज्या शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करायचा आहे, त्यांना देखील तो करता येत नाहीय, कारण पुन्हा पिककर्ज घेण्यासाठी ७/१२ उतारा उतारा तलाठ्याकडून मिळेल किंवा नाही, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. यामुळे कर्जभरण्यास विलंब होत आहे, तर ज्यांनी कर्जाचा भरणा केला आहे, त्यांना कर्ज काढण्यासही विलंब होत आहे.