COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड : भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित  ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. या ऑडिओ क्लिपमध्ये नामदेवशास्त्रींना धमकी दिलीय. दसरा मेळाव्यानंतर नामदेवशास्त्रींना काय करायचं आपण भविष्यात पाहून घेऊ, असं व्हायरल होणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. 


 वरील व्हिडिओमध्ये ऐका संपूर्ण ऑडिओ क्लीप 


दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा गाजत असतो पण यावर्षी मात्र भगवानगडाचा दसरा मेळावा गाजणार आहे. भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू द्यायला नामदेवशास्त्रींनी विरोध केलाय. तर आपण गडावर जाणारच, असा आक्रमक पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतलाय.


भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रस्थान बनलाय. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केलाय. पण पंकजा मुंडेंनी मात्र पारंपारिक दसरा मेळाव्यासाठी ‘भगवानगडावर चला’ची हाक दिलीय. गडावर पंकजांचं भाषण झालंच पाहिजे, असा मुंडे समर्थकांनी आग्रह धरलाय.


या संदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विटर, फेसबूक आणि यू ट्यूबच्या माध्यमातून आपण भगवान गडावर जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच वंजारी बांधवांनाही त्यांनी भगवान गडावर येण्याची हाक दिली आहे. 


भगवानगडाचे हे महंत आता गडाचा राजकीय गैरवापर होऊ द्यायला कितीही विरोध करत असले तरी त्यांची नियुक्ती गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय आशिर्वादाने झालीय. पण गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे आणि महंत यांच्यातले संबंध दुरावले आणि त्यातूनच हा वाद चिघळला.


पंकजा मुंडेचा व्हिडिओ...



गडावरच्या या वर्चस्ववादाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिणभावातला राजकीय संघर्षही कारणीभूत आहे, असंही बोललं जातंय. धनंजय मुंडेंच्या राजकीय आशीर्वादामुळेच महंतांनी पंकजांशी वाद ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.