धुळ्यात पालकमंत्र्यासमोर कार्यकर्त्याला मारहाण
आपल्या न्यायहक्कासाठी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवत दाद मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडलीय.
धुळे : आपल्या न्यायहक्कासाठी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवत दाद मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडलीय.
साक्री तालुका शिवसेना प्रमुख विशाल देसले यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार महिन्याभरापूर्वी काही तरुणांनी दिली होती.
शिवसेना पक्ष सोडत असल्याच्या कारणातून चक्क पोलीस ठाण्यातच विशाल देसलेनं मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
विशाल देसलेवर कारवाई व्हावी, यासाठी काल या तरुणांनी पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव यांनी मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित कार्यकर्त्यांनी केलाय.
तर ध्वजारोहणासाठी पोलिसांनी आंदोलकांना हटकल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केलाय. तर पोलीस उपअधीक्षक हिंमतराव जाधव यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर प्रतिक्रिया देणार असल्याचं झी 24 तासला सांगितलंय.