`उद्दाम` प्रकाश मेहतांच्या वागण्याचे विधानसभेतही पडसाद
महाड दुर्घटनेनंतर घटनास्थळी भेट देणारे रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणाची चर्चा आज विधानसभेतही झाली.
मुंबई : महाड दुर्घटनेनंतर घटनास्थळी भेट देणारे रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणाची चर्चा आज विधानसभेतही झाली.
पत्रकाराला दमदाटी करण्यावरून तसंच मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन गंभीरतेनं माहिती घेत असताना त्यांच्या पाठी उभं राहून सेल्फी काढण्यात गुंग असलेले मेहता चर्चेत आले. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केलीय.
कारवाईची मागणी
मुख्यमंत्री माहिती घेत असताना पालकमंत्री सेल्फी काढण्यात मश्गूल होते... नातेवाईकांसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला तर मेहतांनी धक्काबुकी केली... ज्या भाषेत पालकमंत्री बोलले, जो उद्दामपणा केला त्यावरून त्यांना घटनेचं गांभीर्य नाही, हे स्पष्ट होतंय. मेहतांविरोधात कारवाई व्हायला हवी... त्यांनी माफी मागायला हवी... असं विखे पाटलांनी म्हटलंय.
मंत्र्यांना आचारसंहिता?
तर, पालकमंत्र्यांनी मर्यादा पाळून प्रसारमाध्यमांसमोर जबाबदारीनं माहिती द्यायला हवी... असं होत नसेल तर मंत्र्यांना आचारसंहिता लागू करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या जयंत पाटीलांनी केलीय.
यावर, झालेल्या प्रकाराबद्दल मेहतांनी माफी मागितली आहे... ते येतील तेव्हा अधिक स्पष्टीकरण देतील, असं सांगून गिरीश बापटांनी वेळ मारुन नेलीय.