नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : अखेर पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला... मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिष्टाई यशस्वी झाली. भूमीपूजन 24 तारखेलाच पार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून सुरू असलेलं मानापमान नाट्य संपलं... पंतप्रधानांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचं भूमीपूजन 24 डिसेंबरला होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि ते मार्गदर्शनपर भाषणही करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिष्टाई केली. ती यशस्वीही झाली. 23 तारखेला राष्ट्रवादीने नियोजीत केलेला भूमीपूजनाचा कार्यक्रम आम्ही रद्द करत आहोत असं खुद्द महापौर प्रशांत जगताप यांनीच जाहीर केलंय. तसंच 24 तारखेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीही सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात मुख्य मंचावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास खात्याचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर आणि स्वतः शरद पवार असणार आहेत. तर आमदार आणि खासदारांसाठी स्वतंत्र स्टेज असणार आहे.


आधी राष्ट्रवादीच्या विरोधाला काँग्रेस, मनसेनंही मोठ्या दिमाखात साथ दिली होती. पण आता राष्ट्रवादीचाच विरोध संपल्यामुळे विरोध करणारे उरलेले दोन पक्ष संतापलेत. राष्ट्रवादीवरच आता त्यांनी टीकास्त्र सोडलंय. 


पुणे मेट्रो ही पहिल्यापासूनच वादात अडकली होती. त्या वादांचा भूमीपूजनाच्या निमित्ताने कळस झाला होता. आता राष्ट्रवादीचाच विरोध गळून पडल्याने भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारलेत हे मात्र नक्की