पुणे : पुण्यातलं हे व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस... या गेस्ट हाऊस मध्ये फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उप सचिव दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांनाच प्रवेश आहे. हे गेस्ट हाऊस एव्हढ अधुनिक आहे कि, गच्चीवर हेलिपॅड देखील आहे. पण या योग्य देखभाली अभावी या गेस्ट हाऊसची सध्या दुरावस्था झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडब्यूडीने तब्ब्ल सत्तर कोटी खर्च करून हे गेस्ट हाऊस उभारलंय. पण, सध्या ते सुमित नावाच्या एका खाजगी ठेकेदाराच्या ताब्यात आहे. कारण, पीडब्यूडीने देखभाल , दुरुस्ती आणि सेवा - सुविधा पुरवण्याचं काम या ठेकेदाराला दिलंय. पण, या सेवेचा दर्जा असा आहे कि, अंघोळीला पाणी मिळत नाही. आणि वेळेवर साधा चहा देखील मिळत नाही. पीडब्यूडीचे अधिकारी देखील स्वतःच त्रुटी असल्याचं मेनी करतात. 


या फाइव्ह स्टार व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसच्या काचा काही ठिकाणी फुटल्यात. त्या बदलायला वेळ नाही म्हणून, असे हिरव्या रंगाचे कपडे बांधले आहेत. त्यामुळं अपघाताची शक्यता आहे. समोरून चकाचक दिसत असले तरी, आतमध्ये असा कचरा पडलेला आहे. थेट विभागीय आयुक्तांनीच लक्ष घातल्याने सुधारणा करण्याची आणि ठेकेदार बदलण्याची भाषा पीडब्यूडीचे अधिकारी आता करत आहेत. पण, संबंधित ठेकेदार मात्र यावर बोलायला तयार नाही. 


लोकप्रतिनिधी देखील या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमुळे नाराज आहेत. कारण लोकांच्या पैशातून हे गेस्ट हाऊस उभारलं असलं तरी, तिथं आमदार - खासदारांना प्रवेश नाही. फक्त नोकरशहा त्याचा उपभोग घेऊ शकतात. तेही उपसचिव आणि त्यावरील दर्जाचे अधिकारी. अगदी मंत्र्यांच्या पीएनाही इथं प्रवेश आहे.  पण, आमदार - खासदारांना नाही. 


एखाद्या खाजगी हॉटेल व्यवसायिकाने असे हॉटेल उभारले असते तर, त्यातून मोठी कमाई देखील केली असती. मात्र, या गेस्ट हाऊस मधून पीडब्यूडीने कमाईचे सोडा, ताबाही खाजगी ठेकेदाराला दिलाय. तो त्यातून कमाई तर करतोय तेही, कुठलीही गुंतवणूक न करता. यालाच म्हणतात सरकारी कारभार.