कल्याण : धावत्या गाडीतून चढू किंवा उतरु नका, असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं. मात्र तरीही लोकांमध्ये जागरुकता येत नसल्याचंच दिसून येतंय. त्यामुळे जीवावर बेतण्याचा प्रसंग येऊ शकतो, याचंच आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण रेल्वे स्थानकातून भूदान एक्स्प्रेस निघाली होती. नेमक्या त्याचवेळी स्थानकात धावत आलेल्या अर्चना त्रिपाठी या महिलेनं, सामान आणि बाळासह गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र धावत्या गाडीमध्ये, सामान आणि बाळाला घेऊन अर्चना यांना चढता आलं नाही. तरीही त्यांचा गाडी पकडण्याचा अट्टाहास सुरुच होता. या धडपडीत त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्या. त्यामुळे एकच आरडाओरडा झाला. 


नेमक्या त्याचवेळी रेल्वे दलात कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या जवानांनी अर्चना त्रिपाठी या महिलेचे प्राण वाचवले. गाडी सुरू झालेली असतानाही त्या महिलेने बाळ व सामान सहप्रवाशांकडे दिले, त्यानंतर ती चढण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल गेला आणि ती गाडीखाली फेकली गेली. गाडी सुरू झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. 


तेवढय़ात, स्थानकात फेरीवाल्यांवर कारवाई करणारे कल्याण रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक एस नरवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. आणि प्रसंगावधान राखत इतर प्रवाशांच्या मदतीनं, अर्चना यांना फलाटावर खेचून घेऊन त्यांचे प्राण वाचवले. नरवार यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र पोलीस ठाण्यांतर्गत नंतर सत्कारही करण्यात आला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.