रायगड / रत्नागिरी : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगलाच पहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत रत्नागिरीत ५६ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. सर्वाधिक पाऊस पडलाय तो मंडणगड आणि खेड तालुक्यात... मंडगडमध्ये ८८ आणि खेडमध्ये ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 


दापोली तालुक्यात ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी प्रश्न सुटलाय. रत्नागिरीतील ६३ धरणांपैकी तब्बल ३१ धरणं तुडूंब भरली आहेत. उर्वरित धरणांमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. 


तर, रायगड जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्हयाच्या सर्वच भागात दमदार पाउस झाला. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये १३९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.


तळा तालुक्यात सर्वाधिक १३३ मिलीमीटर पाऊस बरसला. भाताच्या लावणीची ६० टक्के कामं पूर्ण झाली असून उर्वरीत आठवडाभरात ती पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. आठवडाभर पाऊस नसल्याने नागरिक उकाडयानं हैराण झाले होते आता मात्र हवेत गारवा निर्माण झालाय.