राज ठाकरे घेणार गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा मंडळांची भेट
दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती.
मुंबई : दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. दहीहंडी जोरात साजरी करण्याचं आवाहनही मनसेकडून करण्यात आलं होतं. तसे पोस्टरही ठाण्यामध्ये लागले होते.
दहीहंडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या गोविंदा पथकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या या गोविंदा मंडळांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. रविवारी ठाण्यमध्ये जाऊन राज ठाकरे गुन्हा दाखल झालेल्या मंडळांना भेटणार आहेत.
ठाण्यामध्ये मनसेच्या स्थानिक नेत्यांसह 16 गोविंदा मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नऊ थर लावणाऱ्या जय जवान मंडळाचाही यामध्ये समावेश आहे. 20 फुटांची मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं घालून दिल्यावरही ठाण्यात मनसे आयोजकांकडून 40 फूट दहीहंडीसाठी अकरा लाखांचं बक्षिस ठेवण्यात आले होते.