मुंबई : रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसवा खासदार रामदास आठवले चक्क मुख्यमंत्री पदी विराजमान झालेत. त्यांना CM पदाची लॉटरी लागली. त्यांना वास्तवात मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी एका सिनेमात मुख्यमंत्री पदाचा मान मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे रामदास आठवले प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपला आठवले यांना मंत्री करण्याची कोणतीच घाई नाही, असे दिसत आहे. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील युवा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या ‘कन्यारत्न’ नावाच्या चित्रपटात रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत. मुलगी वाचवा, मुलगी जगवा, शिकवा असा सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग कर्जत आणि शिरूर परिसरात झालेय. 


पांढरा झब्बा आणि ब्लॅक जॅकेट परिधान केलेल्या आठवलेंनी कॅमेऱ्यासमोर मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली. रामदास आठवलेंसोबतच या चित्रपटात रासपचे नेते महादेव जानकर, राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील आदी नेते पाहुणे कलाकार असणार आहेत. 


मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेसाठी चर्चेतील चेहरा हवा होता. तेव्हा आठवले या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती वाटले. आठवले यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. मात्र, हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असल्याने त्यांनी होकार दिला आणि आम्हाला CM मिळालेत.