`आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं`
ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.
पुणे : ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या, अशी आमची जुनी मागणी आहे. पण आमचे आरक्षण काढण्याचा प्रयत्न केला तर सगळे जातील पण आमचं आरक्षण जाणार नाही, असंही रामदास आठवले म्हणालेत.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आरक्षणावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात शिक्षणाच्या संधी बऱ्याच आहेत मात्र आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची वेळ येते. पुढे ते नोकरी व्यवसायासाठी तिथेच स्थायिक होतात. अशा तरुणांना पुन्हा मायदेशात बोलविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं होतं.
या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर अखेर मुक्ता टिळक यांनी सारवासारव केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण तरुणांना भारतात कमी संधी आहे म्हणून ते परदेशात जातात, असं मुक्ता टिळक म्हणाल्या.