सांगली : तासगाव नगरपालिकेची निवडणूक यंदा सुद्धा चुरशीची होणार आहे. नेमकं काय चित्र आहे याठिकाणी. कुणाची सरशी होऊ शकते पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. (व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तासगाव नगरपालिका गेली 15 वर्षे स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पूर्वी राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील गट विरोधात काँग्रेसचे संजय काका पाटील गट अशी निवडणूक होत होती. मात्र २०११ च्या अगोदर संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०११ च्या निवडणुकीत आर आर पाटील आणि संजय काका पाटील यांच्या गटाने एकत्र निवडणूक लढवली आणि सत्ताही संपादन केली. 


मात्र २०१४ साली संजय काका पाटील हे भाजपकडून सांगलीचे खासदार झाले. आणि त्याच वर्षी आर आर पाटील यांच निधन झाले. आर आर आबांच्या निधनानंतर मात्र तासगाव नगरपालिकेची सत्ता खासदार संजय काका पाटील आणि पर्यायाने भाजपच्या ताब्यात गेली. 


सध्या संजय काका पाटील गटाचा नगराध्यक्ष आहे. यावेळी राष्ट्रवादीचीच सत्ता येईल असा विश्वास पक्षानं व्यक्त केलाय तर भाजपची एकहाती सत्ता येईल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. एकीकडे राजकारण जोरात आहे तर दुसरीकडे तासगावचे नागरिक समस्याग्रस्त आहेत. 


तासगाव शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे.  २४ तास पाणी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. उद्यांनाचा प्रश्न आहे. शहरातील मोठं कॉम्प्लेक्स अजूनही अपूर्ण आहे. शहरातील मध्यवर्ती जागेत असणा-या छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. शहरातील बायपास रस्त्याचं काम अपूर्ण आहे.  शहरात मोठा उद्योग धंदा उभा राहू शकला नाही. यासारखे अनेक राजकीय मुद्दे प्रचारात असणार आहे.



भाजपा खासदार संजय काका पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासाठी राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीकोनातून ही निवडणूक फार महत्वाची आहे.