रवींद्र कांबळे, सांगली : दंगलमध्ये आमिरनं गीता-बबिता फोगटचा संघर्ष दाखवला. अशीच एक रिअल लाईफ 'दंगल' सुरू आहे सांगलीमधल्या तुंग गावात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 वर्षांच्या संजना बागडीचा इथे कुस्तीचा सराव सुरू असतो. तिचे आजोबा नाथा बागडी तिला कुस्ती शिकवतात. एवढ्या छोट्याशा खेड्यात कुस्तीची मॅट आणि इतर साहित्य कुठून मिळणार... मग नाथा बागडींनीही महावीर फोगटसारखं घराच्या मागच्या बाजूला माती आणून आखाडा तयार केला... आणि मॅट म्हणून मदतीला आल्या त्या जुन्या गाद्या आणि गोधड्या...


संजना 58 ते 60 किलो वजनी गटात कुस्ती खेळते. एकदा गावच्या जत्रेत ती कुस्ती बघायला गेली आणि तेव्हापासून कुस्तीपटू व्हायचं तिनं पक्कं केलं. संजनाचा हा हट्ट बघून 'म्हारी छोरी छोरोंसे कम है' के म्हणत नाथा बागडी कामालाच लागले.


संजनाची उल्लेखनीय कामगिरी


आजोबांच्या घरच्याच आखाड्यात संजनाचा सराव सुरू झाला... आणि पाहता पाहता या धाकड मुलीनं मोठी मजल मारली...


- मुंबई महापौर केसरी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक


- दिल्ली, बंगळुरू, म्हैसुरमधल्या स्पर्धेत बक्षीसं


- म्हैसूरमधल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक  


ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायची संजनाची इच्छा आहे. संजनाचं कुटुंब पोटाला अक्षरशः चिमटे काढून तिच्या या कुस्तीच्या सरावाला मदत करतंय. संजनाच्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय... पण त्यातून दिवसाला शंभर दोनशे रुपयांचं उत्पन्न मिळतं. मासे मिळाले नाहीत तर हाताला काहीच लागत नाही. कुटुंबातल्या 13 जणांचं पोट या व्यवसायावरच आहे. तरीही संजनाच्या कुस्तीला प्रोत्साहन दिलं जातंय आणि तिला हवी ती मदत त्यांच्या परीनं केली जातेय.


परिस्थितीशी दोन हात


संजनाबरोबर आता गावातल्या इतर मुलीही या खेळासाठी सराव करताना दिसत आहेत. परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी संजनाची आणि तिच्या घरच्यांची जिद्द कायम आहे. एखादा कुस्ती पटू तयार करायचा असेल तर महिन्याचा खर्च  किमान वीस ते पंचवीस हजार इतका येतो. संजनाची जिद्द पाहून अहमदनगरमधले उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी तिला 66 हजारांची मदत केलीय. पण ती अपुरी आहे. 


ज्या परिस्थितीत संजना कुस्तीचे धडे घेतेय आणि तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे... संजनाकडे उत्तम कुस्तीपटू होऊन देशाचं प्रतिनिधित्व करण्याची ताकद नक्कीच आहे. पण शाबासकीच्या थापेबरोबरच थोडीशी आर्थिक मदत आणखी मिळाली तर सांगली संजना बागडीही भविष्यातली गीता फोगट नक्कीच होऊ शकेल.