राजकारणात सक्रीय होण्यासाठी तिनं घटवलं 60 किलो वजन
अनेक ठिकाणी `ती` निवडून आलीय. जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये `महिलाराज` पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 82 महिलांच्या गळात नगरसेविकांची माळ पडलीय. त्यामध्ये अनेक नवे चेहरे पहायला मिळतायत... त्यांच्यापैकीच एक आहे सायली वांजळे...
अश्विनी पवार, पुणे : अनेक ठिकाणी 'ती' निवडून आलीय. जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 82 महिलांच्या गळात नगरसेविकांची माळ पडलीय. त्यामध्ये अनेक नवे चेहरे पहायला मिळतायत... त्यांच्यापैकीच एक आहे सायली वांजळे...
सायली रमेश वांजळे... वय वर्षं 22... दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या म्हणूनच आजपर्यंत तिची ओळख... मात्र, सायलीने आता आपली नवी ओळख निर्माण केलीय ती नगरसेविका होऊन... नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये जवळपास 14 हजार मतांनी ती निवडून आली... आणि महापालिकेला नगरसेविका म्हणून अजून एक तरुण चेहरा मिळाला... तिनं प्रशासकीय अधिकारी बनावं अशी खरं तर रमेश वांजळे यांची इच्छा होती... सायलीनं पॉलिटिकल सायन्समध्ये एमए केलंय. वडिलांचा आदर्श ठेऊनच राजकारणात पुढे जाणार असल्याचं ती सांगते.
घटवलं 60 किलो वजन
नगरसेविका म्हणून पुढच्या पाच वर्षांत जनतेसाठी शिक्षण, रोजगार, झोपडपट्टी विकास यांसारख्या गोष्टींवर सायली लक्ष लक्ष केंद्रित करणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपली प्रतिमा आणि व्यक्तिमत्व जपण्यासाठी सायलीनं विशेष मेहनत घेतलीय... लहानपणा पासूनच ओव्हरवेट असल्यानं वजन कमी करण्यासाठी सायलीने विशेष प्रयत्न केले. सायलीनं चक्क 60 किलो वजन घटवलंय.
सायलीला जरी हे यश मिळालं आज असलं तरी तिच्या कुटुंबाला या तिच्या यशाबाबत आधीपासूनच खात्री होती, असं तिची आई हर्षदा वांजळे सांगतात.
पुणे महापालिकेमध्ये आत्तापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता होती... आता मात्र भाजपचा झेंडा पालिकेवर फडकलाय... मात्र, मोदी लाटेमध्येही आपलं अस्तित्व सिद्ध केलेले नवनिर्वाचित नगरसेवक तसे विरळच... मात्र, रक्तातच राजकारण असलेल्या सायलीनं मात्र या लाटेतही आपले पाय घट्ट रोवलेत.