चंद्रपूर : येथे नुकतीच एक आगळीवेगळी पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार बोलावली होती सातवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी. ही पत्रकार परिषद त्यांनी का बोलावली होती आणि या परिषदेत नेमकं झालं तरी काय!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपुरात सातवीत शिकणारी दोन मुले दफ्तराच्या ओझाखाली दबलीत. ओझाला कंटाळलेल्या समस्त विद्यार्थ्यांचे हे दोघे प्रतिनिधी आहेत. आपल्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि जगासमोर आपली कैफियत मांडली. एवढ्या कमी वयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू व्यवस्थित मांडणा-या या चिमुरड्यांचं सर्वांनाच कौतुक वाटतं. 


दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्राचार्यांना दोनवेळा पत्र दिले. परंतु, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर माध्यमांसमोर यावे लागल्याचे ऋग्वेदने बोलून दाखविले. इतकंच नाही तर ऋग्वेदनं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना फोन केला. मात्र त्यांनी उचलला नाही. पत्रकार परिषदेत येण्यासाठी जवळच्या मित्रांना बोलावले. मात्र, अनेकांच्या पालकांनी पत्रकार परिषदेला येण्यापासून रोखलं, असंही त्यानं सांगितलं. पाल्याला ओझे वाहने शक्य होत नसल्याने अनेक पालक दुस-या मजल्यापर्यंत दप्तराचे ओझे स्वत: वाहत असल्याचे चित्र यानिमित्तानं बघायला मिळाले.


ऋग्वेदनं, शाळेतच लॉकरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शाळेच्या मैदानात उपोषण करण्याचा इशाराही त्यानं दिलाय. आता तरी शिक्षण मंत्री विनोद तावडे या चिमुकल्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.