जळगाव : शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ फसवणूक प्रकरणी, न्यायालयात दिलासा न मिळाल्याने शिवसेना उपनेते आणि जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील आज न्यायालयापुढे शरण आले. 


संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मृत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


याप्रकरणी आमदार पाटील यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने फेटाळल्याने ते न्यायालायापुढे शरण आले. त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पाटील यांना अटक करण्यात आली. 


पद्मालय संस्थेचे सभासद महारू काशिनाथ बेलदार हे १८ ऑगस्ट १९९६ रोजी मयत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसा उल्लेख प्रोसिडिंगला करून सभेत नवीन कार्यकारिणी गठित केल्याचे हे प्रकरण आहे. 


औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठापुढे प्रकरणाची सुनावणी झाली. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून गुलाबराव पाटील यांनी आधी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो न्यायाधीश ए. के. पटणी यांनी फेटाळून लावला होता.