प्रणव पोळेकर, रत्नागिरी : राज्यात सेना भाजप युती असली तरी कोकणात मात्र युती फुटलीय. होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना भाजपानं स्वतंत्र चूल मांडलीय. दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार दिलाय. त्यामुळे कोकणात राजकीय फटाके फुटू लागलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात आणि राज्यात सेना भाजप युतीचं सरकार आहे आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनीदेखील युती झाल्याची घोषणा केली. मात्र, तळागाळात युतीबाबतचं चित्र वेगळं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजप यांचे स्थानिक पातळीवर मनोमिलन झालेलं नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपने रत्नागिरीत 'एकला चलो'चा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.


तर दुसरिकडे शिवसेनेनं पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात युतीचे आदेश दिले असतानादेखील रत्नागिरीत सेना भाजपामध्ये युती झालेली नाही. भाजपच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेनेनं दंड थोपटले. शिवसेनेनंदेखील आपला उमेदवार दिलाय. दोन्ही पक्षांनी प्रचाराचा नारळदेखील फोडला. जोरदार प्रचारदेखील सुरु झालाय. जिल्ह्यात शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरपालिकांमध्ये विराजमान होतील, असा दावा शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केलाय.  


राज्यात युतीचे आदेश असतानादेखील रत्नागिरीत शिवसेना भाजपाने स्वतंत्र चूल मांडलीय. कोकणात शिवसेनेचं जरी वर्चस्व असलं तरी भाजपा हळू हळू का होईना जिल्ह्यात हात पाय पसरतेय. या दोघांच्या वादात कुचंबना होतेय ती स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची...