नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटच्या माध्यमातून लष्करात जवानांची बोगस भरती करण्याचं रॅकेट उघड झाले आहे. दिल्लीमधून चालणाऱ्या या रॅकेटच्या माध्यमातून ४० ते ५० बोगस जवान लष्करात दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लष्करातील शिपायासह चार उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. दोघा एजंटांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या लष्करी जवानांच्या भरवशावर देश सुरक्षित आहे. त्याच लष्करी दलात बोगस जवानांनी शिरकाव केल्याची धक्कादायत घटना नाशिकमध्ये उघड झाली. हरियाणा रिक्रूट बोर्डाच्या नावाने दिल्लीत भरती प्रक्रिया झाल्याच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरेशकुमार महंतो, तेजपाल चोपडा, बलदीन गुजर, सचिन गुजरसिंग या चौघांनी नाशिकच्या आर्टीलरी सेंटरमध्ये प्रवेश मिळवला. लष्करी अधिका-यांचे बनावट सही शिक्के मारलेली कागदपत्र दाखवून आर्टीलरी सेंटरमध्ये त्यांनी 15 दिवस वास्तव्यही केलं. मात्र त्यांची कागदपत्र पोस्टाने का आली नाहीत म्हणून नाशिकच्या कार्यालयाने दिल्लीत लष्करी कार्यालयाशी संपर्क साधला असता अशी कुठलीही भरती झाली नसल्याचं उघड झाले.


या चौघांची चौकशी केली असता राजस्थानचा टेकचंद सीताराम मेघवाळ, दिल्लीचा मदन मानसिंग या एजंटना 5 ते 10 लाख रूपये देऊन लष्करात भरती झाल्याचा गौप्यस्फोट झालाय. या कामात गिरीराज घनश्याम चौहानसिंग या 105 राजपुताना रायफलमध्ये कार्यरत असलेल्या शिपायाची मदत झाली. अशा प्रकारे 40 ते 50 बोगस जवानांची लष्करात भरती झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. 


नाशिकसह अहमदनगर, नागपूर आणि पुण्यातील लष्करी दलात बोगस जवान कार्यरत असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे लष्कर आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. या घटनेला केवळ बोगस भरतीच्या दृष्टीकोनातून न बघता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहणे गरजेचं आहे. यातल्या आरोपींचा तातडीने सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.