यवतमाळ : यवतमाळच्या लिंबी गावात कमी उंची असलेल्या वर-वधूचा अनोखा विवाहसोहळा समस्त गावक-यांच्या साक्षीनं पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंचीनं कमी असलेल्या विवाहेच्छूक वधू-वरांना साजेसा जोडीदार मिळवण्यासाठी खूप शोधाशोध करावी लागते. मात्र, गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं तीन फुटाच्या नवरदेवाला पावणेतीन फूट उंचीची नवरी मिळाली आणि दोघे विवाहबंधनात अडकले. 


बारावी पर्यंत शिकलेल्या गजाजनला आपलं लग्न होईल की नाही याची खात्री नव्हती. शिलाच्या आई-वडिलांनाही असाच प्रश्न सतावत होता.  पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात त्याचाच प्रत्यय या लग्नात आला. 


विशेष म्हणजे २५ वर्षांपूर्वीही लिंबी गावात असाच मंगल सोहळा संपन्न झाला होता. वधू शिलाच्या आई-वडिलांचा म्हणजेच सर्कसमध्ये जोकरची भूमिका करणा-या शिवा रेड्डी आणि ईजूबाईंचा. त्यांची सोयरीक जुळवलेल्या भाऊरावांनीच गजाजन आणि शिलाचं लग्न ठरवलं.


सामाजिक दायित्व ओळखणाऱ्या मंडळींमुळे गजानन आणि शिला विवाहबद्ध झाले असले तरी शासनानं कमी उंचीच्या मंडळींसाठी सामाजिक न्यायाचे पाऊल उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.