देशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा
संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे.
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी तसंच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स असे एकूण जवळपास १३ लाख कर्मचा-यांचे पगार पहिल्या आठवड्यात झाले. पण बँकांकडून आजवर नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकलेले नाहीत. स्टेट बँकेच्या शहरातली नव्वदपैकी चाळीस एटीएम चलन तुटवड्याअभावी बंद आहेत. तर जिल्ह्यातील ९०६ एटीएमपैकी सुमारे ६०० एटीएम बंद आहेत. रिझर्व्ह बँकेने कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी बँकांना चलन पुरवठा कमी केला आहे. त्याचा परिणाम बँकांच्या तिजोरीवर झालाय.
बँकेत मोठ्या रकमा काढण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना चेकने व्यवहार करण्याचा सल्ला बँकांकडून दिला जातोय. पैसे देण्यास टाळाटाळ केली जातेय. पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा तुरळक वितरीत होत आहे. बहुतांशी एटीएम पाचशे आणि दोन हजाराचं चलन कॅलिब्रेट करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नोटांचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे सत्तर टक्के एटीएम ड्राय झाली आहेत.
शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुरेल एवढीच रक्कम आहे. त्यामुळे आरबीआयकडे साडेतीनशे कोटी रूपये नाशिक जिल्ह्यासाठी मिळावे अशी मागणी लीड बँकेने आरबीआयकडे केलीय.