सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात माकड तापाने थैमान घातलंय.  ६६ जण या साथीनं बाधित असल्यानं जिल्हा आरोग्य यंत्रणाही हादरलीय. या विचित्र साथीनं हैराण झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाला पालकमंत्र्यांना सामोरं जावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गात गेले काही महिने विचित्र साथ पसरली आहे. अचानक ताप येणं, अशक्तपणा जाणवणं अशी या तापाची लक्षण आहेत. गेल्या १० दिवसात या साथीनं जास्तच डोकं वर काढलंय. ६६ जण या साथीनं बाधित आहेत. 


बांदा आणि दोडामार्ग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरूयत. माकडामुळे हा ताप पसरत असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येतंय. गेल्या काही दिवसात माकड मरून पडण्याचे प्रकार या भागात वाढलंय. या मृत माकडाच्या अंगावर असलेली बोचूड माणसाला चावल्यावर ही साथीची लक्षण दिसायला सुरुवात होते. 


अधिवेशनात व्यस्त असलेल्या पालकमंत्री दीपक केसरकरांनी बांदा आरोग्य केंद्राला भेट दिली त्यावेळी त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या परिसरात मृत माकडांच्या विल्हेवाटीचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरलेल्या या साथीची तीव्रता वाढतेय. याला वेळीच प्रतिबंध न घातल्यास आणखी काही जणांना प्राणास मुकावे लागेल. याची दखल घेऊन तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे.