मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य, घरात सिलिंडरखाली साप
मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला.
वाशिम : भूगर्भातली उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळे मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला. त्यामुळं घरातली गृहिणीच्या तोंडचं पाणीच पळालं.
उज्ज्वला गोडबोले या घरात काम करत असताना त्यांना अचानक सापाच्या फुत्कारण्याचा आवाज आला.. हा आवाज सापाचा आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी झोपलेल्या लहान मुलीला घेऊन घरातून पळ काढला. घरात पाहिलं असता हा साप सिलिंडरच्या खालच्या बाजूच्या एका छिद्रात अर्ध्यापेक्षा अधिक अडकला होता. त्या छिद्रातून त्याला बाहेर पडता येत नव्हते. या सापाला बाहेर काढण्यासाठी अखेर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.
मात्र, त्यांच्याकडूनही साप काही बाहेर निघेना. तब्बल तीन तासाहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करुनही हा साप बाहेर काही निघाला नाही. अखेर सापाला सिलिंडरसह वनपर्यटन केंद्रात नेण्यात आले. तिथं वनजमूरच्या प्रयत्नाने सिलिंडरच्या छिद्रात अडकलेल्या सापाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.