...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!
नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...
माधव चंदनकर, भंडारा : नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...
पाण्याच्या भांड्यात साप पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. जंगलातून हा साप पकडला असेल तुम्हाला वाटेल. मात्र हा जिवंत साप चक्क नळातून निघालाय. भंडाऱ्यात ही धक्कादायक घटना घडलीय.. प्रभाग क्रमांक एकमध्ये राहणा-या वसंत काकडे यांच्या नळातून हा जिवंत साप निघालाय.. नळातून येणारा हा साप पाहून काकडे यांची घाबरगुंडी उडाली.. सर्पमित्रांच्या मदतीने हा साप बाहेर काढला.. भंडारा नगरपरिषद आणि पाणीपुरवठा विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करुन याची चौकशी करावी अशी मागणी संतप्त भंडारावासियांनी केलीय.
परंतु, नळातून साप येणं शक्यच नाही असा दावा नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सवील कांबळे यांनी केलाय.
दीड लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी फक्त दोनच टाक्या आहेत. या टाक्यांच्या १०० वर्ष जुन्या पाईपलाईनची योग्यरित्या काळजी घेण्यात आली नाही.. त्यामुळं नागरिकांना विकत पाणी घ्यावं लागतंय.
दूषित पाण्यामुळं नागरिक कायम हैराण असतात.. मात्र आता थेट नळातून साप येत असल्यानं सामान्यांचं आरोग्य रामभरोसे म्हणावं लागेल.