नागपूर : नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला रामदेव बाबांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकल्प पुढील मार्च-एप्रिलला सुरु करणार असल्याची घोषणा योग गुरु आणि पतंजली समूहाचे अध्यक्ष राम देव बाबा यांनी केली. शेतक-यांकडून पतंजली कुठल्याही मध्यस्थाशिवाय सरळ धान्य आणि इतर साहित्य विकत घेणार असून शेतकऱ्यांना अत्यल्प दारात कर्ज देखील उपलब्ध देखील करून देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. पतंजलीमुळे देशातील विदेशी ब्रँड येत्या २ वर्षात हद्दपार होणार असल्याचे ते म्हणाले. 


नागपूरच्या मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर पतंजली समूहातर्फे प्रस्तावित हर्बल अँड फूड पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याच्या आधीच माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी रामदेव बाबा यांना जमीन अतिशय कवडीमोल भावात दिल्याच्या आरोप करत जमिनीच्या व्यवहाराची CBI चौकशी मागणी केली होती. 


मुत्तेमवार यांच्या टीकेला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. हे नेते आपल्या उभ्या आयुष्यात जनतेकरता काहीही करू शकले नसल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. 


नितीन गडकरींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारनं हा व्यवहार अतिशय पारदर्शी पद्धतीने केल्याचा दावा  केला. जमिनी संदर्भात तीनदा निविदा काढण्यात आल्यात. पण प्रत्येक वेळी फक्त रामदेव बाबा यांच्या पतंजली समुहातर्फेच प्रतिसाद मिळाला, असं मुख्यमंत्री म्हणाले.