नांदेड : "एक गांव एक लग्न तिथी" अशी परंपरा एका गावात गेल्या 28 वर्षापासुन पाळली जाते. गावातील गरीब असो वा श्रीमंत, किंवा कोणत्याही जातीचा. गावातील ज्यांचे विवाह वर्षभरात जुळतात अश्या सर्वांचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात थाटात लावून दिले जातात. या गावातील हा अनोखा विवाह सोहळा.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातील कोंढा या गावात एकाच मांडवात 15 जोडप्यांचं लग्न लागतंय..  या गावानं गेल्या 28 वर्षांपासून  "एक गांव एक लग्न तिथी" ही परंपरा जोपासली आहे. एकाच मंडपात, एकाच दिवशी, एकाच वेळेस इथं गावातल्या मुलां-मुलींचं लग्न लावलं जातं. विशेष म्हणजे गावातल्या सर्व धर्मीयांचे लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यात लावले जातात.


यंदा या सोहळ्यात आत्महत्या केलेल्या तीन शेतक-यांच्या मुलींचेही लग्न लावण्यात आलं.. गरीब असो की श्रीमंत, नेता असो की मजुर गावतल्या प्रत्येकाला सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न लावणं बंधनकारक आहे. त्यासाठी गावातल्या मुलां मुलींची सोयरिक जुळवतांनाच पाहुण्यांना सामूहिक विवाह सोह्ळ्यात लग्न लावण्याची अट घातली जाते. त्यानंतर सर्व गावकरी एकत्रित बसून लग्नाचा तिथी ठरवतात. आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण गांव कामाला लागतं...


या सोहळ्यासाठी गावातील सर्वचजण आर्थिक मदत करतात.. विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना कोणतंही काम करावं लागत नाही. सोहळ्यासाठी नेमलेले तरूणच सर्व कामे करतात... या विवाह सोहळ्याचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं केलं जातं. या सोहळ्यात विवाह झाल्यामुळे वेळ, पैसा, सर्वांचीच बचत होते. शिवाय गरजू कुटुंबाना मोठा आधार मिळतो..  


 एका उत्सवाप्रमाणे दरवर्षी कोंढेकर हा सामूहिक विवाह सोहळा साजरा करतात... लग्नसोहळ्यावर वाढता खर्च.. आर्थिक विवंचनेत असलेली कुटुंब यांच्यासाठी हा लग्नसोहळा म्हणजे गावकीचा आधारच. गेल्या 28 वर्षापासुन कोंढा या गावानं जोपासलेली  एक गाव एक तिथी ही सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा निश्चितच इतर गावांनीही अनुकरण अशीच आहे.