कोकणातील पहिल्या ३०० कोटी रेल्वे कारखाना कामाचे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन
३०० कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या रेल्वेच्या कोकणातील पहिल्या कारखान्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
रत्नागिरी : देशभरातील रेल्वेला रोलिंग स्टॉक कंपोनंट पुरवणाऱ्या आणि अंदाजे ३०० कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या रेल्वेच्या कोकणातील पहिल्या कारखान्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या नव्या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास ५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच अन्य कामेही तरुणांच्या हाती मिळतील.
महाराष्ट्राच्या सर्व विभागात रेल्वेच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर एक कंपनी स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून महाराष्ट्रातील रेल्वेचाही विकास करण्याची योजना तयार झाली आहे. पुढील काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन यांच्या उपस्थितीत या कंपनीचाही शुभारंभ होईल अशी घोषणा आज केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खेडमधील लोटे एमआयडीसीत केली.
सुरेश प्रभू यांच्या हस्ते चिपळूण-खेड दरम्यानच्या औद्योगीक वसाहतीत 50 एकर जागेवर कोकणातल्या पहिल्या मध्यवर्ती रोलिंग स्टॉक कंपोनंट कारखान्याचा शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. या कारखान्यातून कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वे अशा देशभरातील सर्व रेल्वेंच्या विविध गरजा भागवल्या जाणार आहेत. आज केवळ कारखान्याचं भूमीपुजन झालेलं नसून कोकणातल्या औद्योगिकरणाचंही भूमिपूजन आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लवकरच वेंडर डेव्हल्पमेंट प्रग्रॉम सुरू केला जाईल आणि त्या माध्यमातून देशात उत्पादनाचा दर्जा सांभळणाऱ्या लघु उद्योजकांना रेल्वेबरोबर जोडून घेतले जाईल, असेही सुरेश प्रभू यांनी जाहीर केले. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे ते म्हणालेत.