रविंद्र कांबळे, सांगली : मुलगी नको या हट्टापायी एका आईचा बळी गेला आणि दोन मुली पोरक्या झाल्या... म्हैसाळ गर्भपात प्रकरणानंतर स्वाती जमदाडेंच्या मुली आई कधी येणार? असाच सवाल करताना दिसतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वरांजली आणि प्रांजली या चिमुकल्या आईच्या मायेला मुकल्यात... त्यांची कुठलीही चूक नसताना त्यांच्या वाट्याला मोठी शिक्षा आलीय. गर्भपात झाल्यामुळे आईचा मृत्यू झालाय तर त्यांच्या आईला गर्भपात करायला लावणारे वडील अटकेत आहेत. मम्मी कुठे गेली, ती कधी येणार या विचारात या चिमुरड्यांच्या नजरा लागल्या आहेत.


स्वरांजली आणि प्रांजलीच्या वडिलांना तिसरी मुलगी नको होती म्हणून प्रवीण जमदाडेनं पत्नी स्वातीला जबरदस्तीनं गर्भपात करायला लावला... म्हैसाळचा डॉक्टर खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये त्यासाठी शस्त्रक्रिया करायला लावली. पण त्यात स्वाती जमदाडेचा मृत्यू झाला. आता प्रवीण जमदाडे अटकेत आहे. मात्र यात कुठलीही चूक नसलेल्या स्वरांजली-प्रांजलीचा आधारच कोसळलाय.  


अशा अनेक स्वरांजली, प्रांजली आईच्या उदरातच मारल्या जातायत. असे प्रकार थांबावेत यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. 


स्वाती जमदाडेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना, दोषींना शिक्षा होईलही, मात्र निष्पाप स्वरांजली आणि प्रांजलीची आई परत कशी मिळणार?